Friday, March 25, 2011

किल्ले कर्नाळा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी  



पनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठा सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो.कर्नाळ्या खालचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे. एक ते दोन दिवसाच्या भटकंतीत येथील सर्व किल्ले फिरून होतात.इतिहास :

किल्ल्यांमध्ये असणा-या टाक्यांवरून हा सातवाहनकालीन असावा असे वाटते मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणा-या २३ किल्ल्या मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.






गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

हा किल्ला प्रसिद्ध आहे तो येथील पक्षी अभयारण्यामुळे. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात. वाटेने किल्ल्यावर येतांना एक दरवाजा लागतो. दरवाजा ब-याचशा ढासळलेल्या
अवस्थेत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच, भवानी मातेचे मंदिर आहे. समोरच एक मोठा वाडा आहे. वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाडाच्या समोरच शंकराची पिंड आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहे. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही.

कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :
मुंबई - गोवा मार्गाने : मुंबई - गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर लगेसच पुढे कर्नाळ्याचा परिसरलागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एस.टी बस येथे थांबते. समोरच असणा-या हॉटेलजवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्रशस्त आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास पुरतात. वाटेतच बाजूला पक्षी संग्रहालय आहे.
रसायनी - आपटा मार्गाने : रसायनी - आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते.

राहण्याची सोय : किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्याच्या असणा-या शासकीय विश्रामधामात रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय : किल्ल्याखाली हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय : गडावर बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : २ १/२ तास.

किल्ले अंजनेरी

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी  


अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.

इतिहास:

अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला म्हणुनच या किल्ल्याला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले.येथे १०८ जैन लेणी सापडतात.



गडावरील ठिकाणे

अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायर्याच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बर्यापैकी प्रशस्त आहे. त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा,गंगापुर,मुकणे,दारणा,कश्यपी,गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखे आहे.पठारावर १ तलाव आहे.




गडावर जाण्याच्या वाटा

किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी फाट्यावर उतरावे. या फाट्यापसुन १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी या गावात पोहोचावे. गावातून नवरा - नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायर्या लागतात. पायर्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दिड तास पुरतो.

Tuesday, March 22, 2011

किल्ले तोरणा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी    


 तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. 
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रिच्या रांगेतून दोन पदर निघुन पुर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात.

इतिहास:

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव 'प्रचंडगड' असे ठेवले.

पुण्याच्या नैऋत्येस पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पुर्व रेखांशावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेस कानद नदिचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेस कानद खिंड तर पुर्वेस बामण व खरीव खिंडी आहेत.

हा किल्ला कधी व कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या व मंदिरांच्या अवशेशावरुन हा शैवपंथांचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीत मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहित गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व त्याचे नांव प्रचंडगड असे ठेवले.

गडावर जाण्याच्या वाटा

स्वारगेट बसस्थानकावरुन जाणा-या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन.
गडावर जाणारी वाटः कठीण - राजगड 
मार्गे - तोरणा

उंची : १४०० मी.
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव : वेल्हा
डोंगररांग : पुणे

Sunday, March 13, 2011

किल्ले प्रतापगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी   


नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोप-या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.
महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.


जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरुनि आ रानमोळी





अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पाय-या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे.




मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आह इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.

इतिहास :

१६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.




प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.

कसे जाल?  


महाड,पोलादपूरकडून किव्वा वाई ,महाबळेश्वरकडून आलं कि ,कुंभरेशी किंवा वाद नावाचे छोटुकल गाव लागतं .गडाच्या आग्नेयेस पारं नावच खेडं आहे .दोन्ही गावांमधून प्रतापगडावर जाता येतं

किल्ले शिवनेरी

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी   



जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे.

शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते.किल्ला तसा फार मोठा नाही.१६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.



इतिहास

जीर्णनगर, जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठा प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक उल तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली.




पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ. स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार. इ. स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. १६७८मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

* शिवाई देवी मंदिर-

सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदीराच्या मागे असणा-या कडात ६ ते ७ गुहा आहेत.या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे .

* अंबरखाना-

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितिस या अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणा-या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.

* पाण्याची टाकी-

वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.

* शिवकुंज -

हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे.याची स्थापना व उदघाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. जिजाउंच्या पुढात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भावातील मायलेकरांचा पुतळा शिवकुंजा मध्ये बसविला आहे.शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.

* शिवजन्म स्थान इमारत-

शिवकुंज येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच बदामी पाण्याचे टाकं आहे.

* कडेलोट कडा-

येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.


गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

* साखळीची वाट :

या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

* सात दरवाज्यांची वाट :

शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा .या मार्गेकिल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तासलागतो.

कसे जाल ?

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते९ किलोमीटरवर शिवनेरी १९ कि.मी. अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो

किल्ले पन्हाळा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी   


पन्हाळगड हा कोल्हापुर भागातील महत्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात.

भौगोलिक स्थान:

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.

कसे जाल ?

चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते.ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो.हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .




इतिहास:पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता.याचे पहिले नाव पन्नग्नालय .अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८-११-१६५९ ला घेतला.किल्ला विजापुरांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला.२ मार्च १६६० मध्ये किल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला.छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकुन पडले होते. गुप्तहेरांनी शोधुन काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरुन निसटले. पुढे पावनखिंडीत(घोडखिंड) नरवीर बाजी प्रभु देशपांडे यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जौहरच्या सैन्याला आपल्या प्राणांचे बलिदान देउन थोपविले.
१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला.पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला होता. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.




ऐतिहासिक घटना:


हा किल्ला छत्रपती शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला. याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ. स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती.




गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

* राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय.वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे.आज यात नगरपालिका कार्यालय,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बॉईज होस्टेल आहे.

* सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते.याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यास ठेवले होते.शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.

* राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते.याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले.हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे.याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.

* अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला.याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारेआहेत.यात वरी,नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे.याशिवाय सरकारी कचे-या ,दारुगोळा अणि टाकंसळ होती.

* चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय.इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला.थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत.येथेच "शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.

* सोमाळे तलाव -गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे.तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे.ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.

* रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी -सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात.त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.

* रेडे महाल-याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुत- ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.

* संभाजी मंदिर-त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.

* धर्मकोठी-संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

* अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते.ही वास्तू तीन मजली आहे.सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे ,तर मधला मजला ऐसपेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

* महालक्ष्मी मंदिर-राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे.हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे.ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे .राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

* तीन दरवाजा-हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा .दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला. बाजीप्रभुंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.


Thursday, March 10, 2011

किल्ले सिंहगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी     



पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठुनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापुर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.

इतिहास:

पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.या युध्दाबाबत सभासद बखरीत खालील उल्लेख आढळतो:



तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करुन वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.



गडावरील ठिकाणे:

दारूचे कोठार:
दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे दिसणार्या कोठारावर दि. सप्टेंबर ११ इ.स. १७५१ मध्ये वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसाचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला:
रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या बंगल्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राहण्यासाठी येत. इ.स. १९१५ साली लोकमान्यांची आणि महात्मा गांधींची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर:
हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी आणि सांब असून हे मंदिर यादवकालीन आहे.

देवटाके:
तानाजी मालूसरे यांच्या स्मारकाच्या मागे डाव्या हाताला हे प्रसिद्ध पाण्याचे टाके आहे. याचा उपयोग आजही पिण्याचे पाण्यासाठी म्हणून होत आहे. म. गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा:
गडाच्या पश्चिमेस असणारा ह्या दरवाजावर शिलालेख आढळतो


गडावर जाण्याच्या वाटा:

सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु मैदानाकडून जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.

मार्ग: 
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.

स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.